छत्रपती संभाजीनगर : जनहिताचे प्रश्न मांडणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार यांच्यावर कथित खोट्या तक्रारी दाखल करून दबाव निर्माण करणे, मानसिक त्रास देणे तसेच धमकावण्याचे गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यघटना बचाओ संघर्ष संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव महाले यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
महाले यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, अवैध प्लॉटिंग, भूमाफिया, आर्थिक गैरव्यवहार आणि नागरिकांच्या हक्कांशी संबंधित विविध प्रश्न संघटनेमार्फत सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात असल्याचे नमूद केले आहे. या जनहिताच्या कामामुळे काही व्यक्तींच्या हितसंबंधांना बाधा येत असल्याने संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
₹39 लाखांचा कथित आर्थिक व्यवहार चर्चेत
या तक्रारीत श्री. गुरुप्रीतसिंग राजेंद्रसिंग चहल यांच्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला असून, विविध व्यवसाय व आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून सुमारे ₹39 लाखांची रक्कम स्वीकारण्यात आल्याचा कथित आरोप करण्यात आला आहे. सदर रक्कम परत मागितल्यानंतर धमकी देण्यात आली आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचेही निवेदनात नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणासंदर्भात उत्तमनपुरा पोलीस ठाणे येथील CSR क्र. 0308/2026, दिनांक 24 जून 2026 असा संदर्भ तक्रारीत देण्यात आला आहे.
बँक व्यवहारांपासून WhatsApp संदेशांपर्यंत तपासाची मागणी
या कथित आर्थिक व्यवहारामागील सत्य बाहेर आणण्यासाठी संबंधित व्यक्तींचे बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्रे, संदेश, कॉल रेकॉर्ड, WhatsApp व इतर इलेक्ट्रॉनिक संदेश तसेच उपलब्ध पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा आढळल्यास तात्काळ FIR दाखल करून सखोल तपास करावा, अशी स्पष्ट मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
जनहिताच्या आवाजाला गप्प करण्याचा प्रयत्न?
विशेष म्हणजे, या आर्थिक व्यवहाराच्या वादाचा वापर संघटनेच्या पदाधिकारी किंवा पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी अथवा त्यांना कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी करण्यात आला आहे काय, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जनहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करून पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाले यांनी केली आहे.

“पोलीस यंत्रणेचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही”
पत्रकारांच्या कामात अडथळा आणणे, धमकी देणे किंवा दबाव निर्माण करणे यासारखे प्रकार आढळल्यास त्याचीही गंभीर दखल घेण्यात यावी. जनहितासाठी आवाज उठविणाऱ्या नागरिकांना आणि पत्रकारांना आवश्यक संरक्षण देण्यात यावे, तसेच तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ₹39 लाखांच्या कथित आर्थिक व्यवहारापासून ते जनहिताच्या तक्रारी करणाऱ्या पदाधिकारी व पत्रकारांवर दबाव आणल्याच्या आरोपांपर्यंत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यासच सत्य समोर येणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता या तक्रारीवर नेमकी कोणती भूमिका घेते आणि आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर कायदेशीर कारवाई होते का, याकडे छत्रपती संभाजीनगरचे लक्ष लागले आहे.





