छत्रपती संभाजीनगर : शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून घराची चावी त्यांच्या ताब्यात देणे एका महिलेला महागात पडल्याची घटना न्यू पहाडसिंगपुरा परिसरात समोर आली आहे. घरातील कपाटातून सुमारे १ लाख ९९ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या सासू-सुनेविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शारदा प्रशांत गायकवाड (वय ४२, रा. न्यू पहाडसिंगपुरा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या कामानिमित्त घराबाहेर पडत होत्या. यावेळी त्यांनी नेहमीच्या विश्वासातून आपल्या घराची चावी शेजारी राहणाऱ्या पार्वती भोजने आणि त्यांची सून वैष्णवी भोजने यांच्याकडे सोपवली होती.
मात्र, शारदा गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या अनुपस्थितीत दोघींनी घर उघडून कपाटातील दागिने चोरून नेल्याचा आरोप आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचा नेकलेस, अंगठ्या, कानातील झुमके, सोन्याची चैन तसेच लहान बाळाच्या सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ९९ हजार ६५० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरात परतल्यानंतर कपाटातील दागिने गायब असल्याचे शारदा गायकवाड यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पार्वती भोजने आणि वैष्णवी भोजने यांच्याकडे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे बेगमपुरा पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींवरील आरोप अद्याप तपासाधीन आहेत.




