छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने माजी केंद्रीय राज्यमंत्री व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. या बैठकीत खाजगी रुग्णालयांवरील अन्यायकारक नोंदणी व नूतनीकरण शुल्क, लहान रुग्णालयांवरील जाचक नियम, आणि डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांविरोधातील उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. IMA ने स्पष्ट केले की महानगरपालिका द्वारे आकारले जाणारे शुल्क दुहेरी कर आहे, कारण हे रुग्णालये आधीच Bombay Nursing Home Act अंतर्गत नोंदणीकृत आहेत. यावर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. कराड यांनी यासंदर्भात महापालिकेला आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.

IMA ने यावेळी ५० खाटांखालील रुग्णालयांना Bombay Nursing Home Act मधून सूट देण्याची विनंती केली, जेणेकरून लहान हॉस्पिटल्सना कार्य करताना अडथळे येणार नाहीत. शिवाय, डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर केंद्र सरकारने कठोर कायदा बनवावा व त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, ही देखील एक महत्त्वाची मागणी होती. डॉ. कराड यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच या मुद्द्यांवर पुढील संयुक्त बैठक आयएमए राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत लवकरच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

या बैठकीस डॉ. उज्वला दहिफळे, डॉ. योगेश लक्कास, डॉ. संभाजी चिंतले, डॉ. प्रशांत दरक, डॉ. प्रदीप बेजर्गे, डॉ. अर्चना भांडेकर, डॉ. सोनाली सावजी व डॉ. बाबासाहेब उनवणे हे डॉक्टर सहभागी झाले होते. प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्र यामधील समन्वय बळकट व्हावा, तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, ही या चर्चेची प्रमुख अपेक्षा होती. IMA शाखेचे अध्यक्ष डॉ. टाकळकर व सचिव डॉ. लक्कास यांनी सांगितले की, संघटना वैद्यकीय व्यावसायिकांच्या हक्क व सन्मानासाठी सदैव सजग राहील.