चोरट्यांचा प्रसत्न फसला : ठाकरे नगरातील घटना
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी अचानक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शंका आल्याने सावध झालेल्या महिलेने आरडा ओरड करीत गळ्यातील मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. परिणामी चोरट्यांचा चेन हिसकावण्याचा प्रयत्न फसला. ही घटना मुकुंदवाडी परिसरातील ठाकरेनगर भागात घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोपाल संतोष निकस रा. एन ३ सिडको यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार १० जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते पत्नीसह ठाकरेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. फिर्यादी दर्शन घेऊन मेडिकल दुकानावर निघून गेले. तर फिर्यादीची पत्नी दर्शन घेऊन घरी परतत होती. त्याचवेळी दोन अनोळखी तरुण शाईन मोटरसायकलवर पाठीमागून आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच अंदाज आल्याने महिला सावध झाली. गळ्यातील सोन्याची चेन पकडून ठेवले. आरडा ओरड करीत मदतीसाठी नागरिकांना बोलावले. हे पाहून मंगळसूत्र चोरट्यांनी धूम ठोकली. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.