नाशिक : (प्रतिनिधी) नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत चालला आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा नाशिक जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचा दहावा बळी आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे. अशामध्ये नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातलं आहे. वाईन फ्ल्यूचा जिल्ह्यात दहावा बळी

गेला आहे. निफाडमधील एका ५८ वर्षांच्या व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी ६ नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिक शहरातील स्वाईन फ्ल्यू बाधितांची संख्या ३५ तर ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. स्वाईन फ्ल्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.