जालना (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली. यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर श्री. जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदिपान भूमरे, आमदार राणा जगजितसिंह, आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी श्री. जरांगे यांची भेट घेतली. श्री. देसाई यांनी जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन श्री. जरांगे यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

त्यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीची शासनाने दखल घेतली असून त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. इतर मागण्यांबाबतही शासनाची भूमिका सकारात्मकच आहे, त्यामुळे श्री. जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असे यावेळी श्री. देसाई यांनी सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत श्री. जरांगे यांनी एक महिन्याची मुदत देत आपले उपोषण स्थगित केले. यावेळी जिल्हा व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.