कन्नड (प्रतिनिधी शिवाजी नवले) तालुक्यातील पिशोर येथील भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्री परवाना निलंबित करणे बाबतचा प्रस्ताव प्राधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे उपविभागीय कृषी अधिकारी, सिलोड सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी कन्नड बाळराजे मुळीक व पंचायत समिती कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या पथकाने आज दिनांक ०८ जून २०२४ रोजी पिशोर येथील कृषी सेवा केंद्राची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये भाग्यलक्ष्मी शेती साहित्य कृषी सेवा केंद्र, पिशोर यांच्याकडे तुळशी कंपनीचे कबड्डी हे कापसाचे वाण दुकानात उपलब्ध असताना कृत्रिमरीत्या टंचाई भासवून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध नसलेबाबत सांगितले. याबाबत याबाबत शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर याबाबत वरील पथकाने सापळा रचून शेतकऱ्यांना दुकानावर पाठविले, परंतु संबंधित दुकानदार

यांनी कबड्डी कापूस वाणाचे बियाणे उपलब्ध नाही असे म्हणत बियाणे दिले नाही. याबाबत वरील पथकाने दुकानाची व गोदामाची पाहणी केली असता दुकानांमध्ये कबड्डी वाणाचे ७ पॅकेट आढळून आले. तसेच बियाणे विक्री स्टॉक रजिस्टर अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वरील अनियमितता व बियाणे विक्री कायद्याचा भंग केल्याप्रकरणी भाग्यलक्ष्मी शेती साहित्य कृषी सेवा केंद्र, पिशोर यांचा परवाना निलंबित करण्यासाठी परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तालुक्यातील जे कृषी सेवा केंद्र कापसाचे कबड्डी, संकेत व पंगा या वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करतील व खतामध्ये चढ्या भावाने खतांची विक्री करतील, अशा कृषी सेवा केंद्राचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे.