छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाहतुकीची बातमी छापल्याने पत्रकाराच्या दुचाकीला हायवाने ठोकर मारून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ६ जानेवारी रोजी वडोदबाजार येथे घडली असून, या प्रकरणी २२ जानेवारी रोजी दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडोदबाजार येथील पत्रकार हेमंत वाघ यांनी या भागातील अवैध वाळू वाहतुकीची बातमी एका वृत्तपत्रात छापली होती. याचा राग मनात धरून ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता गाव शिवारात वाळूने भरलेल्या हायवाने हेमंत वाघ यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या घटनेत वाघ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी उपचार घेतले. याबाबत वाघ यांनी २२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता वडोदबाजार पोलिस ठाण्याततक्रार दिली. त्यावरून आरोपी शेख रईस (रा. सावंगी) व हायवाचा अनोळखी मालक यांच्याविरोधात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे करीत आहेत.