मराठा, मुस्लीम आणि ओबीसी समाजाचा विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतलेला आहे. मराठा समाजाच्या हातात राज्यातील सर्व सत्तासूत्र असतानाही मराठा समाजावर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या एका छोट्या गावातील नेत्यामागे राज्यातील सर्व मराठा समाज एकवटण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी फक्त आंदोलन करून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या विचारांचे लोक विधानसभा आणि संसदेत पाठवावी लागतील. याचा मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मागच्या आठवड्यात दिल्लीत बोलत असताना मी बोललो की, महाराष्ट्रात आजघडीला सर्वात मोठा नेता कोणता असेल तर तो मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून लोक त्यांच्याकडे आकृष्ट झालेले आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना लोक लगेच ओळखतात. पण जरांगे पाटील कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे.
“पण मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. त्यात पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे”, अशी टीका जलील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.