छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरच्या टोड पहाडसिंगपुरा परिसरातील बुद्ध लेणी लगतच्या गट क्रमांक 37 मध्ये गंभीर स्वरूपाचा पर्यावरण आणि शहरी नियोजन उल्लंघनाचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिक संतोष सांडुजी भिंगारे यांच्या तक्रारीनुसार, घरमालक सुनील मिसाळ यांनी विनापरवानगी झाडांची कत्तल करून त्याच ठिकाणी तीन मजली इमारत उभारली आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या नियमानुसार या परिसरात २२ फूटांपेक्षा अधिक उंचीचे बांधकाम निषिद्ध आहे. या प्रकारामुळे परिसरातील हरित पट्ट्याचे मोठे नुकसान झाले असून, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि महाराष्ट्र झाडांचे संरक्षण अधिनियम 1975 अंतर्गत झाडांची कत्तल ही स्पष्टपणे दंडनीय आहे. इतकेच नव्हे तर बांधकाम नियमानुसार परवानगी न घेता उभारण्यात आलेली ही इमारत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चेही उल्लंघन करते. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तक्रारदार भिंगारे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि उपवन विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः झाडांची विनापरवानगी कत्तल करणाऱ्या सुनील मिसाळ यांच्यावर कठोर कारवाई, तसेच बेकायदेशीर इमारतीवर मनपाने तत्काळ तोडक कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
सदर प्रकरणात महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे आणि वनविभागाचे दुर्लक्षही संशयास्पद ठरत असून, येत्या काही दिवसांत या तक्रारीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. पर्यावरण आणि नागरी कायदे पायदळी तुडवणाऱ्या घटकांवर उदाहरणात्मक कारवाई झाली नाही, तर शहराच्या इतर भागांतही अशाच प्रकारचे उल्लंघन वाढू शकते.
