छत्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी ): शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून माजी खासदार इम्तियाज जलील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पत्रकार परिषदेत ‘हरिजन’ हा अवमानकारक शब्द वापरल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलील यांनी वारंवार ‘हरिजन’ शब्द वापरून संपूर्ण अनुसूचित जातींचा अपमान केल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी संघटनांनी केला आहे. पत्रकार परिषदेत जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना “हरिजन समाजासाठी राखीव असलेली वाळूज एमआयडीसीतील जमीन बेकायदेशीररीत्या हडपली” असा आरोप केला. यावेळी त्यांनी सातत्याने ‘हरिजन’ असा शब्द वापरला, ज्यामुळे अनुसूचित जातीतील महार समाजाच्या भावना दुखावल्या. सुप्रीम कोर्टाने २०१७ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार हा शब्द वापरणे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा असल्याचे स्पष्ट आहे. तक्रारदार लक्ष्मण हिवराळे यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते पोलिस ठाण्यात उपस्थित होते. अमित भुईगळ, अरुण बोर्डे, कैलास गायकवाड, जालिंदर शेंडगे आदी कार्यकर्त्यांनी यावेळी जलील यांच्या भूमिकेचा निषेध केला व कठोर कारवाईची मागणी केली.

“जलील यांच्यावर यापूर्वीही दलित, बौद्ध समाजविरोधी वक्तव्याचे आरोप झाले आहेत. त्यांच्या या पद्धतशीर वागणुकीमुळे समाजात रोष आहे. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे,” असा इशारा पँथर संघटनांसह विविध आंबेडकरी चळवळींनी दिला आहे. जर अशी भूमिका कायम राहिली, तर संघर्ष उफाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.