छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : येथील भीमनगर, भावसिंगपुरा भागातील रहिवासी श्री. स्तन उत्तमराव चाबुकस्वार यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या विद्यापीठ शाखेतील अधिकाऱ्यांविरोधात गंभीर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईचे (स्व.) मुक्ताबाई उत्तमराव चाबुकस्वार यांचे निधन ३० एप्रिल २०२४ रोजी झाले असतानाही संबंधित बँक अधिकाऱ्यांनी हयातीचा फॉर्म भरून घेतल्याची नोंद केली व अज्ञात व्यक्तीस बेकायदेशीररीत्या ATM कार्ड वितरीत करून सुमारे १ लाख ७० हजार रुपये त्यांच्या खात्यातून काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चाबुकस्वार यांच्या आईने कधीही ATM कार्डसाठी अर्ज केला नव्हता, तसेच वारसदार म्हणून चाबुकस्वार यांनीही असा कोणताही अर्ज न केल्याचे स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा, अज्ञात व्यक्तीस ATM कार्ड कसे दिले गेले, नवीन मोबाईल क्रमांक लिंक करून व्यवहार कसे झाले, याबाबत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात मा. वरिष्ठ कोषागार अधिकारी, छ. संभाजीनगर यांनी बँकेला पत्राद्वारे सूचित करून मृत व्यक्तीच्या नावे आलेली पेन्शन परत घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बँकेच्या हलगर्जीपणामुळे शासनाचीही फसवणूक झाल्याचा मुद्दा तक्रारीत ठळक करण्यात आला आहे.याप्रकरणी संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चाबुकस्वार यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.