छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला २६ मे रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
शहरात आयोजित संघटनात्मक बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आलेल्या चव्हाण यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “विकसित भारत” या संकल्पनेखाली संपूर्ण देशात “संकल्प ते सिद्धी” कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने राबवलेल्या विविध विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

यामध्ये रस्ते, रेल्वे, संरक्षण व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील वाढ यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांतील प्रगतीचा समावेश असेल. ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपर्यंत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच २१ जून रोजी होणाऱ्या योग दिनाच्या निमित्तानेही हा उपक्रम राबवण्यात येईल.
चव्हाण यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेपर्यंत सरकारच्या यशस्वी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.