छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : संभाजीनगरमधील पाहाडर्सिंगपुरा येथील बुद्ध लेणी परिसरात सध्या जोरदारपणे डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील जैवविविधतेला आणि ऐतिहासिक वारशाला धोका निर्माण होत असूनही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी करूनही कारवाईचा कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. या डोंगर पोखरण्याची अधिकृत परवानगी विचारली असता, संबंधित व्यक्तीकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे स्पष्ट होते. मात्र तरीदेखील रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेसीबी व ट्रकच्या सहाय्याने मुरूम उत्खनन चालूच आहे. यामधून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, मुरूम माफियांना याची कसलीही भीती उरलेली नाही. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असून देखील महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या उत्खननात कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशी अथवा कारवाई झाली नसल्याने प्रशासन आणि भूमाफिया यांच्यातील संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकाराला वेळीच आळा घातला नाही, तर या परिसरातील निसर्गसंपदा, ऐतिहासिक स्थळे आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान धोक्यात येईल. त्यामुळे तातडीने या उत्खननावर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.