छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहराच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या बुद्ध लेणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे, या तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक आणि डंपर वाहनांवर नंबर प्लेटच लावलेली नाही, हे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले असून, हे वाहन अवैधरित्या खुलेआम वावरताना दिसत आहेत..या परिसरात मुरुम उपशामुळे जमिनीचे स्वरूप बदलत असून, मोठ्या प्रमाणावर धूळ आणि ध्वनी प्रदूषण होत आहे.

परिणामी, परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. बुद्ध लेणीसारख्या ऐतिहासिक स्थळाच्या परिसरात पर्यावरणाची होणारी हानी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या असल्या तरी कारवाईची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला बळ मिळत असून, जबाबदार यंत्रणांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संशय उपस्थित होतो. या परिसरात डी. के. एम. एम. फॉरेन्सिक कॉलेज, इंग्लिश स्कूल आणि अन्य शैक्षणिक संस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. विशेषतः कॉलेजच्या मुली या परिसरातून ये-जा करत असतात. अशा वेळी नंबर प्लेटशिवाय भरधाव वेगाने मुरुम घेऊन जाणाऱ्या ट्रकांमुळे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे की, संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी आणि जबाबदारांवर कडक कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याआधीच उपाययोजना करण्यात याव्यात.
