छत्रपती संभाजीनगर : पाहाडसिंगपुरा बुद्ध लेणी परिसरातील गट/ सर्वे ३८, ३९, ४०, ४०/१, ४०/२, ४०/३, महार इनामी जमिनीवरील अवैध उत्खननाला विरोध केल्याने एका दलित महिलेस भूमाफियांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. “इकडे येशील तर जेसीबी खाली दाबून टाकू,” अशी धमकी देत महिलेला भयभीत करण्यात आले.दलित महिलेने आपल्या मालकी हक्काच्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननाबाबत जाब विचारला असता, भूमाफियांकडून वाद वाढवून तिला अपमानास्पद वागणूक दिली गेली.
.जातीवरून अपशब्द वापरत महिलेला जिवे ठार मारण्याचा इशारा देण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर दलित महिला तक्रार दाखल करण्यासाठी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेली. मात्र पोलिसांनी “आज नाही तर उद्या तक्रार दाखल करू,” असे सांगून तिला परत पाठवले. यामुळे दलित महिलेला न्याय मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दलित समाजाने पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
