छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : दि. २५ एप्रिल २०२५:शहरातील वेदांत नगर परिसरात वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी एका तरुणास अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी होऊन सध्या जीवनमरणाच्या संघर्षात आहे. लक्ष्मण भिमराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सचिन लक्ष्मण देशमुख बाबा पेट्रोल पंपजवळील पोलिस चौकी येथे वाहतूक पोलिसांसाठी काही कामे करत होता. दिवसातून जमा होणाऱ्या वसुलीच्या पैशांमधून स्वतःसाठी थोडी रक्कम मागितल्याच्या कारणावरून वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी श्री. नागरगोजे आणि अन्य तीन ते चार पोलिसांनी मिळून सचिनवर अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे सचिन बेशुद्ध पडला. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मण देशमुख घटनास्थळी पोहोचले असता त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पोलिस चौकीसमोर पडलेला दिसला. नंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत सचिनच्या मानेच्या मणक्याला जबर इजा झाल्याचे निदान झाले असून, त्याला अर्धांगवायूचा झटका देखील आला आहे. गंभीर प्रकृतीमुळे घाटी रुग्णालयाने अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे. लक्ष्मण देशमुख यांनी वेदांत नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी उलट दमदाटी करत त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचार करणे कठीण झाल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली असून, दोषी पोलिसांविरुद्ध तातडीने FIR नोंदवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनातील हलगर्जीपणा व बेकायदेशीर वर्तणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी नागरिकांतूनही जोर धरत आहे.
