छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी शेख मोसिन) : 9 एप्रिल 2025: भारताच्या संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे जतन आणि बहुजन समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन” आयोजित करण्यात आले. संपूर्ण देशभरात एकाच दिवशी सुमारे 500 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाचे राष्ट्रीय नेतृत्व मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ति मोर्चा) आणि मा. चौधरी विकास पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा) यांनी केले
. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर मुद्द्यांवर ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. मुख्य मागण्यांमध्ये पारदर्शक बॅलेट पेपर प्रणाली लागू करणे, ओबीसी जनगणना तात्काळ करणे, महापुरुषांचा अवमान थांबवण्यासाठी सरकारला जबाबदार धरणे, महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देणे, वक्फ संपत्तीचे संरक्षण आणि बहुजन समाजावरील विविध अन्यायांविरोधात आवाज उठवणे यांचा समावेश होता. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आपली एकजूट आणि असंतोष व्यक्त केला. आंदोलनाच्या माध्यमातून संविधान आणि बहुजन समाजाच्या रक्षणासाठी एक व्यापक आणि निर्णायक संघर्ष सुरू झाला आहे, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.