फुलंब्री ; { प्रतिनिधी हेमंत वाघ} फुलंब्री : येथील देवगिरी सहकारीकारखाना परिसरात शुक्रवारी रात्री दीड वाजता टांग्याला घोडा व बैल जोडी जुंपून बैलाला रक्त निघेपर्यंत क्रूरपणे अमानूष मारहाण केली. शिवाय रस्त्यावरील इतरांचा जीव व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणाऱ्या दोघांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फुलंब्रीपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या देवगिरी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये शुक्रवारी रात्री दीड वाजता एका टांग्याला एका बाजूने बैल व दुसऱ्या बाजूने घोडा जुंपून भर रस्त्याने बैलाला अमानुषपणे आरी टोचत व काठीने मारहाण करत पळविल्याचा प्रकार घडला.

रस्त्यावरून बबन सुभाष चोपडे व त्याला प्रोत्साहन देणारा दुचाकीस्वार (एमएच २०ईएच ८५५२) हे दोघे जण बैल व घोड्याला अमानुष मारहाण करत टांगा पळवत होते. यावेळी बैलाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोघांजणांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलंब्री पोलिसांची रवाई याप्रकरणी एक टांगा, बैल, घोडा व दुचाकी असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल फुलंब्री पोलिसांनी जप्त केला आहे. तपास पो.नि. संजय सहाने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.