गंगापूर ; गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांच्यासोबत जातीय दुजाभाव करत त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात गंगापूर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भगवान बनकर यांच्या मते, शेततळे आणि गोठा बांधणीच्या कामावरून वाघचौरे यांच्यासोबत वाद झाला. त्यावेळी वाघचौरे यांनी अत्यंत उद्धटपणे वर्तन करत, “तुझी लायकी नाही शेततळे आणि गोठा बांधण्याची,” असे जातिवाचक उद्गार काढले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी बनकर यांना धक्काबुक्की करत, “माझी हीच भाषा आहे, काय उपटायचं ते उपटून घे! तुमची लायकी नाही माझ्यासमोर उभे राहायची,” असे अपमानास्पद वक्तव्य केले.
या प्रकारानंतर भगवान बनकर यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, सुहास वाघचौरे यांचे नाव ऐकताच पोलिसांनी तक्रार घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार म्हणजे केवळ जातीय दुजाभाव नव्हे, तर प्रशासनाच्या मनमानीचे आणि सत्तेच्या गैरवापराचे जिवंत उदाहरण आहे. एका सरकारी अधिकाऱ्याकडून असा वर्तन होणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. या घटनेनंतर गंगापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, भगवान बनकर यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. स्थानिक जनतेने आणि विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.