छत्रपती संभाजीनगर — अपर तहसीलदार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी कडुबाई गोपिनाथ लाटे आणि जुनेदखान बुढनखान यांना अनधिकृत गौणखनिज उत्खनन प्रकरणी नोटीस बजावली असून, एकूण ₹29.63 लाख दंड ठोठावण्याची शक्यता आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे नंबर 107 मधील जागेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत, कडुबाई गोपिनाथ लाटे (रा. मकबरा रोड, बेगमपुरा पोलीस स्टेशन जवळ, छत्रपती संभाजीनगर) आणि जुनेदखान बुढनखान (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी अनधिकृतपणे विटभट्टी तयार करून अंदाजे 445 ब्रास मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) नुसार, संबंधितांकडून मातीच्या अवैध उत्खननासाठी ₹5,34,000/- चा पाचपट दंड, ₹2,67,000/- रॉयल्टी, आणि DFM च्या 10% प्रमाणे ₹26,700/- अशी एकूण ₹29,63,700/- ची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

. संबंधितांना 24 तासांच्या आत सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, परवानगी आदेश प्रत, शासनाकडे जमा केलेली रक्कम, आणि गौणखनिज वाहतूक परवान्यासंबंधी आवश्यक कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, तहसील कार्यालयाने तलाठी यांना सदर नोटीस वेळेत बजावण्याचे आदेश दिले असून, संबंधितांच्या इतर मालमत्तेचा शोध घेऊन स्वतंत्र अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.सदर नोटीसीला उत्तर न दिल्यास, अवैध उत्खनन मानून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ही रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.