गंगापूर (प्रतिनिधी कैसर जोहरी) : नरहरी राजनगाव (पिपरी) येथे रिटायर ग्रामसेवक शिवाजी पवार यांनी घरकुल लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीय, भिल्ल, दलित, मराठा आणि इतर गरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेतून घरे मिळण्याचा हक्क असताना, पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लाखो रुपयांचा अपहार केला. “मीच घरकुलाचे चेक काढतो, गटविकास अधिकारी माझ्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही,” असे सांगत त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे उकळले, मात्र घरे बांधून देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी आवाज उठवला असून, अनेक गरीब कुटुंबे आजही घराच्या आशेवर रस्त्यावर राहत आहेत

. शासनाने दिलेला निधी स्वतःच्या खिशात टाकून पवार यांनी गरिबांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्यांना घरकुलाचा लाभ मिळेल, असे आश्वासन देऊन फक्त पैसे वसूल करण्यात आले, परंतु घरे बांधण्यात आली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून पवार यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एवढेच नाही, तर भ्रष्टाचार करणाऱ्या या अधिकाऱ्याची निवृत्तीवेतन (पेन्शन) तत्काळ बंद करावी, असेही गावकऱ्यांचे मत आहे. आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.