छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : छत्रपती संभाजीनगर शहरातील पहाडसिंगपुरा भागात गट / सर्वे नंबर ४० मधील महार इनामी जमीन काही धनदांडग्या भूमाफियांनी लॉकडाऊन काळात बनावट दस्तऐवज तयार करून बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयातून खोटी बक्षीस पत्रे तयार करून, जुन्या कागदपत्रांत फेरफार करत, मूळ सातबारा उताऱ्यावर खोटी नावे चढवण्यात आली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया मूळ वारसदारांची कोणतीही संमती न घेता आणि अधिकृत परवानगीशिवाय करण्यात आली आहे.सदर जागेचा सन १३४४ चा नमुना नंबर ५, ज्यामध्ये त्या काळातील अधिकाऱ्यांची सही असून, तो कोडी लिपीत असलेला दस्तऐवज आजही उपलब्ध आहे, जो मूळ वारसदारांची हक्काची मालकी दर्शवतो. या ऐतिहासिक आणि अधिकृत दस्तऐवजाची दखल न घेता काही धनदांडग्या लोकांनी बेकायदेशीर मार्गाने मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आणखी गंभीर बाब म्हणजे या भागात कुठलेही बांधकाम किंवा प्रकल्प करता येऊ नये, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही भूमाफियांनी न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात लेव्हलिंगचे काम केले. एवढेच नव्हे, तर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर फार्म हाऊस उभारण्यात आले. प्रशासन आणि संबंधित विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून, मूळ दलित वारसदारांवर मोठा अन्याय होत आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून दशके उलटली, तरी आजही दलित समाजावर अत्याचार होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मोठे धनदांडगे लोक आणि प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी मिळून दलितांच्या हक्काच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या भूमाफियांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे. जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
