छत्रपती संभाजीनगर (पब्लिकराज ब्युरो) – चेलीपुरा भागातील संतोष प्रोव्हिजन्स येथे विक्रीस ठेवलेल्या स्वास्तिक पोहा कंपनीच्या पॅकिंगमध्ये घाण, जाळे आणि आळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फक्त चेलीपुरा पुरता मर्यादित नसून, शहरभर अशा दूषित पोह्यांची विक्री होत असल्याचा संशय आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात अशा निकृष्ट प्रतीच्या पोह्यांची विक्री सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ केला जातोय. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने चौकशी करून स्वास्तिक पोहा कंपनी आणि दूषित माल विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास, हा गंभीर प्रकार संपूर्ण शहरभर पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत!

* ग्राहकाची प्रतिक्रिया *“ आम्ही पैसे देऊन शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ खरेदी करतो, पण जर पॅकिंग केलेल्या पोह्यात आळी आणि घाण असेल, तर जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. संतोष प्रोव्हिजन्स मधून स्वास्तिक पोहा खरेदी करणाऱ्या काही ग्राहकांना पॅक उघडल्यावर त्यात जाळे आणि दूषित पदार्थ आढळले. यामुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. दुकानदारांनी “आम्ही फक्त माल विकतो, जबाबदारी कंपनीची आहे,” असे सांगितले असले तरी ग्राहक याला तयार नाहीत. “दुकानदारांनी माल विकताना त्याची तपासणी करायला हवी. आम्ही खराब अन्न विकत घेत नाही. जर दोष कंपनीचा असेल, तर अन्न व औषध प्रशासनाने दोन्हींकडून उत्तरदायित्व ठरवून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. |