छत्रपती संभाजीनगर: (प्रतिनिधी} ; हर्सूल जेलच्या मागील सवेरा पार्क परिसरात नागरिकांच्या रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण मोतीराम लोखंडे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून, त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सवेरा पार्क, गट नंबर 119/1, प्लॉट नंबर 13 येथे जाण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे संबंधित प्लॉटधारकांना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेकडे जाणे कठीण झाले आहे. संबंधित व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण केला असून, प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“मी वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. माझ्या प्लॉटकडे जाणारा अधिकृत रस्ता बंद केला आहे. मनपाने त्वरित पाहणी करून अतिक्रमण हटवावे,” अशी मागणी अर्जदार लक्ष्मण लोखंडे यांनी केली आहे.

मनपा प्रशासनाची झोप कधी उडणार?
महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग नेहमीच तक्रारी आल्यानंतरही दिरंगाई करतो, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सवेरा पार्कमधील हा प्रकार म्हणजे मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे ठळक उदाहरण आहे. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर पुढील आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्वरित कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. आता प्रशासन कधी जागं होणार आणि नागरिकांना न्याय कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
