छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): शाळेतच अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थिनींना तात्काळ इस्पितळात घेऊन जात रिक्षाचालक अशोक कांबळे यांनी त्यांचे प्राण वाचवले. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या शेरनी राठोड आणि हर्षदा कुलकर्णी या दोन विद्यार्थिनी अचानक अत्यावस्थ झाल्या. शेरनी राठोड हीच्या तब्येतीची परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी प्रशालेतील परिवहन सेवेतील अशोक कांबळे यांनी आपल्या वाहनातून तत्पर सेवा उपलब्ध
करून दिली. यांच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीला वेळेवर उपचार मिळाले.

सरचिटणीस डॉ. रश्मी बोरीकर यांनी शेरनी या विद्यार्थीनी वर तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यामुळे विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यासाठी प्रशालेतील ग्रंथपाल महेश कुलकर्णी तसेच क्रीडा शिक्षिका हेमलता पवार, श्रावणी तुलसी आणि चतुर्थ श्रेणी मानधन कर्मचारी अभिषेक कोठुळे, श्रीमती सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांनी दाखविलेल्या या माणुसकी बद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी सर्वांचे कौतुक केले व इथून पुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.