छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): शहरातील पहाडसिंगपुरा भागात असलेल्या ऐतिहासिक हनुमान टेकडी (गट/सर्वे नं. ३८) येथे सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे हे उत्खनन हनुमान मंदिराच्या पायथ्याशी थेट सुरू असून, मंदिर परिसरालाही लक्ष केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याआधीही अशाच पद्धतीने बुद्ध लेणीच्या जागेवर (गट नं. २९) भूमाफियांनी अनधिकृत आक्रमण केले होते. आता हनुमान टेकडीही त्याच मार्गाने नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, असे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डोंगर पोखरणे, मुरूम उत्खनन आणि सपाटीकरणाचे हे सर्व काम कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता सुरू असून, प्रशासन मात्र गप्प आहे. पोलीस व महापालिकेच्या यंत्रणा मुकदर्शक बनल्या असल्यामुळे भूमाफियांना राजरोसपणे अनधिकृत कामे करण्याचे बळ मिळाले आहे.

जेसीबी आणि डंपरच्या आवाजाने परिसर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दणाणत आहे. कोणत्याही अधिकाऱ्याची भीती न ठेवता हे सुरू आहे, यामागे राजकीय किंवा आर्थिक वरदहस्त असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक रहिवाशांनी या अनधिकृत कारवायांचा तीव्र विरोध नोंदवत, तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांचे होणारे नुकसान, तसेच नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास, शहरासाठी गंभीर इशारा ठरू शकतो. शासनाने त्वरित याची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात याचे दूरगामी परिणाम संपूर्ण शहराला भोगावे लागतील, असा इशारा आता नागरिकांकडून दिला जात आहे.