सिल्लोड (प्रतिनिधी) दि. १२ — सिल्लोड तालुक्यातील हट्टी-मोहाळ येथील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य पती, ग्रामपंचायत लिपीक आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हट्टी-मोहाळ येथे सरपंच ममता कुलकर्णी यांच्या पतीने तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बनसोडे, सदस्य पती पंडित जरारे, लिपीक शाहुबा भोटकर व त्यांच्या पत्नीने आणि ग्रामसेवक लक्ष्मण भोटकर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत गायरान शासकीय जमिनीवर अनधिकृतरीत्या बांधकाम केले आहे. अतिक्रमणाची माहिती संबंधित तलाठी आणि ग्रामसेवकांना असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक करून शासकीय जमिनीचा खाजगी उपयोग केला जात आहे.

दोषी सरपंच, ग्रामसेवक आणि लिपीक भोटकर यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून सेवा निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी समितीचे विभागीय अध्यक्ष दादासाहेब काळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार सिल्लोड यांना निवेदनाद्वारे केली आहे.