खुलताबाद ; { प्रतिनिधी सविता पोळके} ; शहरातील अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश स्कूल येथे स्व. सौ. सविता चिमणे फाउंडेशनच्या वतीने अंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवारी महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक उपक्रमाने महिला दिन अधिक खास बनवला. विविध क्षेत्रांतील प्रथम महिला म्हणून योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याची संकल्पना फाउंडेशनच्या राजश्री चिमणे यांनी मांडली होती, आणि खुलताबादच्या इतिहासात पहिल्यांदाच असा भव्य उपक्रम पार पडला. शहरभरात या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत असून, स्व. सौ. सविता चिमणे फाउंडेशनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमाची सुरुवात स्व. सौ. सविता चिमणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रांतील पहिल्या महिला पुढाकार घेऊन सन्मानित करण्यात आला.यामध्ये पहिल्या महिला उद्योजिका शारदा बारगळ, कांता गोरख नागे,वीरपत्नी कडूबाई घुले,पहिल्या नगराध्यक्षा जुलेखा बेगम,पहिल्या महिला फार्मसिस्ट संगीता कोठारे पहिल्या पर्वतारोही महिला स्मिता वेलदोडे,पहिल्या महिला मूर्तिकार स्वाती नरेंद्रसिंह साळूंके,पहिल्या महिला पत्रकार सविता पोळके पहिल्या महिला व्यवसायीक छायाचित्रकार सुकन्या हिवर्डे यांचा समावेश होता. यशोदा बारगळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.गौरवप्राप्त महिलांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल प्रेरणादायी अनुभव शेअर केले

. त्यांच्या शब्दांमधून स्वप्नांना दिशा देण्याची नवी उमेद मिळाली.स्व. सौ. सविता चिमणे फाउंडेशन समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी शिक्षण आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील २० मुलांना एएफकेजी इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश करून शिक्षणाची संधी देण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी अलीकडेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये शहर आणि तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले. उत्कृष्ट निबंधांसाठी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.याच पार्श्वभूमीवर, जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील ‘पहिली महिला’ म्हणून विशेष मान मिळवलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला अशी माहिती फाउंडेशनच्या राजश्री अजय चिमणे यांनी दिली. कार्यक्रमानंतर उपस्थित महिला पालकांनी विविध खेळ खेळून आनंद साजरा केला आणि एकमेकींना महिला दिनाच्या उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. हा उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला असल्याचे महिलांनी सांगितले.या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रगती बारगळ, प्राजक्ता बारगळ,बुशरा पटेल विधी थेटे,पुजा ठाकुर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता नागे,उज्वला केरे, पल्लवी घोडके, वैशाली शिंदे, उज्वला राजपुत, दिशा पवार आदिंनी परिश्रम घेतले.