छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : दि. 18 जून – वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडलेल्या मोईन शहा यांच्या अमानुष हत्येचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), औरंगाबाद शाखेने तीव्र निषेध नोंदवला आहे. ही हत्या कट्टरपंथी गोरक्षक आणि बजरंग दलाशी संबंधित व्यक्तींनी पूर्वनियोजित कटकारस्थानातून केल्याचा आरोप SDPI ने केला आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे.

SDPI ने या प्रकरणातील काही आरोपींच्या अटकेचे स्वागत करत, सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी व या गुन्ह्याच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी समितीची गरज असल्याचे म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचे बजरंग दल व गोरक्षक संघटनांशी थेट संबंध आहेत. विशेष म्हणजे, विधान परिषदेचे सदस्य संजय केनेकर यांनी कथितरीत्या आरोपींना वाचवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे, ही बाब कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे.
SDPI ने पुढील पाच प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडल्या आहेत –
1. या हत्येच्या पार्श्वभूमीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व कट्टर संघटनांशी आरोपींचे संबंध पूर्णतः उघड होईपर्यंत तपास सुरू रहावा.
2. सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या संघटनांतील नेत्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी.
3. विधान परिषद सदस्य संजय केनेकर यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. अल्पसंख्यांकांसह सर्व नागरिकांचे संरक्षण प्रशासनाने सुनिश्चित करावे.
5. मोईन शहा अत्यंत गरीब कुटुंबातून होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत प्रशासनाने त्वरीत जाहीर करावी.

या प्रसंगी SDPI च्या महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष योसुफ, प्रदेश महासचिव सय्यद कलीम, जिल्हाध्यक्ष समीर शहा, उपाध्यक्ष डॉ. हफीज इमरान, जिल्हा महासचिव मोहसिना खान, नदीम शेख, अब्दुल अलीम, सचिव साकी अहमद, कोषाध्यक्ष हफीज समीउल्लाह, सदस्य अशरफ पठाण आणि आरेफर शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.