“सायबर शिल्ड-2025” : सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची सज्जता वाढवणारी प्रशिक्षण कार्यशाळा

“सायबर शिल्ड-2025” : सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची सज्जता वाढवणारी प्रशिक्षण कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी शेख मोहसीन) : संभाजीनगर येथे “सायबर शिल्ड-2025” या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 8 व 9 एप्रिल 2025 रोजी नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी आणि सायबर सुरक्षा फोरम यांच्या सौजन्याने ही कार्यशाळा श्रीमती रत्नप्रभा पवार सभागृह, मासीआ, चिकलठाणा येथे संपन्न झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ती पार पडली. या प्रशिक्षणात नॅशनल सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे, क्रिप्टो एक्सपर्ट दीपक पटेल, सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे विजयंत गौर आणि CISO प्रा. अमोल वराडे यांनी सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, ओपन सोर्स इंटेलिजन्स, डिजिटल पुराव्यांचे संकलन आणि तपासातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी सायबर पोलिसिंगमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर अनिवार्य असल्याचे नमूद केले. कार्यशाळेत OTP/UPI फसवणूक, फिशिंग, सिम स्वॅप, व्हॉट्सअॅप हॅकिंग, फेक लोन अॅप्स, जॉब व रोमँस स्कॅम्स अशा सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार उलगडण्यात आले.

तसेच AI व डीपफेक तंत्रज्ञानाचा सायबर फसवणुकीसाठी होणारा वापर आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करताना, पोलिसांनी अनोळखी लिंक, QR कोड स्कॅन करणे टाळावे, तसेच फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in किंवा 1930 वर संपर्क साधावा, असे सांगितले. या प्रशिक्षणात 40 वरिष्ठ अधिकारी व 200 हून अधिक पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. प्रशिक्षणातून पोलिसांची सायबर तपासातील कौशल्ये वाढवण्यास मदत होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अन्नपूर्णा सिंह आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून ही कार्यशाळा यशस्वी झाली. “सायबर शिल्ड-2025” मुळे पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाई अधिक सक्षम होणार आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *