छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : राज्याच्या सहकार विभागात खळबळजनक प्रकार उघडकीस आले आहेत. दोन महिला अधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कार्यालयीन शोषण, अपमान, आणि लैंगिक सूचक वागणुकीचे गंभीर आरोप करत थेट सहकार आयुक्तांना सहा पानांचे ‘लेटर बॉम्ब’ पाठवले आहे. या पत्रामुळे विभागात मोठा भूकंप झाला आहे. या महिला उपनिबंधक आणि सहकार अधिकाऱ्यांनी 23 एप्रिल रोजी सहकार आयुक्त तथा निबंधक (सहकारी संस्था), पुणे यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी लिहिले आहे की, “उपनिबंधकपदाचा प्रभारी चार्ज मिळाल्यानंतर मी अनेक प्रलंबित प्रकरणे कलम 101 नुसार निकाली काढली. या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाला, त्यानंतर माझ्यावर सूड उगवण्याची मालिका सुरू झाली.” तक्रारीनुसार, वरिष्ठ अधिकारी शरद जरे, निलेश देशमुख, महेंद्र देशमुख आणि सहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी एकत्रितपणे मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. “माझ्या कार्यालयीन कामांतील फायली गहाळ करण्यात आल्या. काहींनी चक्क शरीरसुखाची मागणी केली आणि सातत्याने माझे चरित्रहनन केले,” असा धक्कादायक उल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारकर्त्या अधिकाऱ्यांनी इच्छेनुसार नार्को टेस्टसुद्धा करून घेण्याची तयारी दर्शवली आहे.

दुसऱ्या महिला अधिकाऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे की, “निलेश देशमुख व महेंद्र देशमुख हे मला सातत्याने लज्जास्पद अपशब्द वापरून मानसिक त्रास देतात. कार्यालयीन कारवायांच्या नावाखाली माझ्या खाजगी वस्तूंची तपासणी करून सातत्याने अपमान केला जातो.” या प्रकारामुळे दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी आपली सहनशक्ती संपली असून, एक महिला म्हणून लज्जास्पद अनुभवांचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली आहे. कारवाई होणार – आयुक्तांची ग्वाही, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सहकार आयुक्त दीपक तवारे म्हणाले, “महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. आमच्याकडे विशाखा समिती कार्यरत आहे. या प्रकरणाची चौकशी त्या समितीकडून करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न? दरम्यान, विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी मात्र वेगळेच स्पष्टीकरण दिले. “शंभर दिवसांत प्रकरणे निकाली काढावी, यासाठी प्रत्येक कार्यालयाची तपासणी केली जात आहे. कुणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करत असल्यास त्यासाठी स्वतंत्र फोरम आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व तक्रारींचे उत्तर देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
