छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहाडसिंगपुरा गट/सर्वे नं. ४०, ४०/२ मधील शासकीय गायरान जमिनीवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून लेव्हलिंग सुरू केले असून, प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या महिनाभरापासून दिवस-रात्र जेसीबी, पोकलँड आणि इतर तांत्रिक यंत्रसामग्रीचा वापर करून अवैध काम सुरू असतानाही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यावर कुठलीही कारवाई करत नाहीत.
विशेष म्हणजे, या जमिनीवर कोणतेही काम न करण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही भूमाफिया बिनधास्तपणे न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काम सुरू ठेवत आहेत.
प्रशासनाचा हा निःक्रिय पवित्रा पाहता, या प्रकरणात मोठ्या राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.सरकारी जमिनीवर चाललेले हे मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण आणि नियमबाह्य उत्खनन त्वरित थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास, शहरभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा जनआक्रोश पाहायला मिळेल.