छत्रपती संभाजीनगर : शालेय पोषण आहार योजना राबविणाऱ्या हजारो महिला कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनात जगण्याची वेळ आली असून, या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज नवभारत कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यभरातून आलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
केंद्र सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्याचे महत्वाचे काम या महिला करत आहेत. मात्र, यांना केवळ २,५००/- रुपये इतकं अत्यल्प मानधन देण्यात येते. त्यातही अनेक वेळा मानधन मिळण्यात विलंब होतो, त्यामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ येते, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला.
अन्य राज्यांमध्ये जसे की केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी आणि लक्षद्वीप येथे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ९,००० ते १०,००० रुपये मानधन दिले जाते. मात्र, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात केवळ २,५०० रुपयांत काम करून या महिलांचे शोषण केले जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
संघटनेने खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
किमान ₹२०,०००/- वेतन द्यावे.
कर्मचाऱ्यांना कायम करावे.
दिवाळी बोनस व सण आगाऊ रक्कम मिळावी.
आरोग्य विमा व अपघाती विमा योजना लागू कराव्यात.
पोषण आहार पुरवठा खासगी कंपन्यांऐवजी स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत करावा.
मागील वर्षी मंजूर झालेले ₹१,०००/- तात्काळ वितरित करावे.
निवृत्तीनंतर पेन्शनची तरतूद करावी.
या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने यावेळी दिला. विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले असून, लवकर निर्णय न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.