छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहानुरवाडी परिसरातील मॉलच्या बांधकामस्थळी मुरूम पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महानगरपालिका बांधकाम विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या भूखंडावर हे काम सुरू होते त्या जमिनीची कोणतीही कायदेशीर नोंद नाही. तसेच या जमिनीचा सातबाऱ्यावर उल्लेख नाही आणि नगररचना विभागाकडेही त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे पत्र देण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर विभागीय आयुक्तांनी तात्काळ भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र सातारा पोलीस ठाण्याकडून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असून, न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस विभागाची भूमिका संशयास्पद बनली आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, कोणतीही अधिकृत नोंद नसलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर काम सुरू होते आणि कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून याची तपासणी झाली नाही. याचा फटका थेट दोन निरपराध नागरिकांच्या जीवाला बसला असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे. अन्यथा पोलिसांच्या भूमिकेवरचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे, असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.