छत्रपती संभाजीनगर : “शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची” हे विधान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) छत्रपती संभाजीनगर शाखेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘IMA कनेक्ट’ उपक्रमांतर्गत विशेष गरजा असलेल्या मुलांच्या ‘आरंभ’ शाळेत नुकतेच आरोग्य परीक्षण व समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. ही मुले Autism Spectrum वर असल्याने त्यांच्या संवाद व आकलनाच्या गरजा वेगळ्या आहेत, आणि म्हणूनच हा उपक्रम वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला. या उपक्रमाची ही चौथी सत्र असून याआधी मातोश्री वृद्धाश्रम, भगवानबाबा अनाथाश्रम आणि विशेष मुलांची निवासी केंद्रे येथे देखील सेवा देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, हा कार्यक्रम ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून, शहरातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न यातून दिसतो. ग्रामीण भागात IMA च्या “Aao Gaon Chale” उपक्रमांतर्गत तीन गावे दत्तक घेऊन सेवा दिली जात आहे.

IMA अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले की, “IMA Connect हा केवळ आरोग्य तपासणीचा कार्यक्रम नाही, तर तो एक सामाजिक बांधिलकी असलेला प्रयत्न आहे. या मुलांच्या मनाशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न होता, आणि हा अनुभव अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.” तर सचिव डॉ. योगेश लक्कास यांनी पुढील काळात असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी डॉ. दत्ता कदम (अध्यक्ष – IMA Connect), डॉ. गौरव साळवे (संयोजक) यांच्यासह अनेक डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, २१ जुलै रोजी “Aao Gaon Chale” उपक्रमांतर्गत पुन्हा एक ग्रामीण सेवा मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. IMA छत्रपती संभाजीनगर ही संघटना ‘Caring Beyond Clinics’ हे ब्रीदवाक्य कृतीतून साकारत असून, तिचे कार्य राज्यभर प्रेरणादायी मानले जात आहे – हेच त्यांच्या सातत्यपूर्ण समाजाभिमुख सेवेमधून दिसून येते.