छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): शालेय पोषण पालकांनी घेतली धाव…आहारातील बिस्कीट खाल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार आज सकाळी केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडला. अस्वस्थ वाटू लागल्याने या विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्र प्रमुख मधुकर शेळके यांनी सांजवार्ताशी बोलताना दिली. राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना पोषण आहारातून बिस्कीटे वाटण्यात आली. ही बिस्किटे खाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. मळमळ होत असेल म्हणून या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी सोडले. त्यानंतर काही वेळाने अनेक विद्यार्थ्यांनी उलटी मळमळ होत असल्याची तक्रार केली.
आरोग्याच्या तक्रारी वाढत गेल्याने केंद्र प्रमुख मधूकर शेळके यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली. मुख्याद्यापक आणि शिक्षकांच्या मदतीने गावातच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र अधिक खबरदारीसाठी १०० ते १५० विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
पालकांनी घेतली धाव…
पोषण आहार खाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थी घरी गेले. मात्र ही संख्या वाढत गेल्याने गावात एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या पालकांनी शाळेत धाव घेतली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. चिमुकल्यांच्या चिंतेने पालक मात्र चांगलेच भयभित झाल्याचे दिसून आले.
शिक्षण विभागाची टीम रवाना शिक्षणाधिकारी चव्हाण
या घटनेबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला माहिती मिळताच तात्काळ अधिकारी केकत जळगाव येथे पाठविण्यात आले. शाळेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आमची टीम घटनास्थळी गेली असून अधिक माहिती घेत आहोत, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.