पैठण (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील कातपूर गावात राहणाऱ्या एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कातपूर येथील नवनाथ शामराव जगधने आणि राहुलनगर येथील विवाहित शितल दोडवे (उघडे) यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, त्यांच्या प्रेमकथेला दुर्दैवी कलाटणी मिळाली. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे विविध ठिकाणी फिरत होते. नवनाथला न्यायालयाने शितलच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो संचित रजेवर बाहेर आला असताना त्यांनी आनंदाचे काही क्षण एकत्र घालवले.

मात्र, रजा संपताच त्याला पुन्हा तुरुंगात परत जावे लागणार होते. या परिस्थितीत २९ मार्च रोजी या दोघांनी कातपूर शिवारातील एका मक्याच्या शेतात विष घेत आत्महत्या केली. ३१ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह अधिकृत तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.