छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : महसूल विभागातील वाढती लाचखोरी आणि गायरान जमिनींच्या गैरवापरामुळे जिल्हा प्रशासन अडचणीत आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत त्यांच्या दालनावर सील ठोकले याअसून, त्यांचा पदभार उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. खिरोळकर यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक शंका उत्पन्न करणारे निर्णय आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे ही कारवाई झाली आहे. महसूल विभागात नियंत्रणाचा अभाव आणि अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे लाचखोरीची प्रकरणे वाढली आहेत. यामुळे प्रशासनाची बदनामी होत असून, जिल्हाधिकारी यांनी २९ मे रोजी सकाळी १० वाजता सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

गायरान जमिनींच्या गैरवाटपाबाबत गंभीर खुलासे समोर आले आहेत. खिरोळकर यांच्या कार्यकाळात सहजापूर, करोडी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी यासह काही बड्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावावर गायरान जमिनी वर्ग बदल करून वर्ग-१ मध्ये केल्या गेल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेत सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, तलाठी आदींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रालयातील ई-७ महसूल शाखेमार्फत या फाईली मंजूर झाल्याचा आरोप असून, त्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. “गायरान जमिनी” म्हणजे सरकारकडे असलेल्या अशा जमिनी ज्या गरीब, भूमिहीन अथवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटपासाठी राखीव असतात. मात्र, या जमिनी पात्र नसलेल्या लोकांना, विशेषत: राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे आरोप असून, संपूर्ण प्रक्रियेवर चौकशीचा धगधगता वावटळ निर्माण झाला आहे. ACBने सुरू केलेल्या तपासातून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.