छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : पहाडसिंगपूरा, खाम नदी पात्र खाम नदीच्या पात्रात पहाडसिंगपूरा रात्रभर अवैध उत्खनन सुरू असून, जेसीबी, पोकलँड आणि मोठ्या ट्रकांच्या आवाजामुळे संपूर्ण परिसर दणाणून जात आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी बेगमपूर पोलीस ठाण्यात तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. स्थानिकांनी सांगितले की, अनेक वेळा रात्रीच्या वेळी उत्खनन थांबवण्यासाठी विचारणा केली असता भू-माफियांचे गुंड उर्मटपणे उत्तर देतात आणि धमकावतात. “परवानगी कुणाकडून घेतली?” असं विचारल्यावर ‘तुमचं काही चालणार नाही’ अशा धमक्याही दिल्या जात आहेत. यामुळे नागरिक, विशेषतः वृद्ध आणि लहान मुले, रात्री झोपू शकत नाहीत. ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक त्रास वाढत असून, भीतीचे वातावरण आहे. या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भू-माफियांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच आहे.

प्रश्न असे –
• पोलीस प्रशासन का गप्प?
• अवैध उत्खननामागे कोणाचे आशीर्वाद?
• नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?
स्थानिकांनी मागणी केली आहे की त्वरित तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि रात्रीचे उत्खनन तात्काळ थांबवावे.