पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना सन २०२५-२६ करिता जाहीर झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम (पीएच.डी.) करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. अद्ययावत QS World University Ranking मध्ये २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच पालकांचे किंवा विद्यार्थी नोकरी करत असल्यास, स्वतःचे मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराने परदेशातील विद्यापीठात पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेला असावा. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. ऑनलाईन अर्जाची प्रिंट घेऊन ती पोस्टाने किंवा प्रत्यक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे – ४११००१ येथे सादर करावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ असून, वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.