छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : चांदणे चौक ते चेलीपुरा रोडवर मेट्रो हॉटेल आणि मेट्रो पान सेंटरच्या परिसरात सर्रासपणे रस्त्यावर गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होते आणि वाहनचालक व पादचारी त्रस्त होतात. गुरुवारी अशाच प्रकारामुळे बाचाबाची झाली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा वाद होण्याचे टळले.
या भागात लिटिल स्टार हायस्कूल असल्याने अनेक लहान मुले शाळेत ये-जा करतात. मात्र, शाळेसमोरच काही लोक धूम्रपान आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या टाकत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनासह पालकांमध्येही नाराजी आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वातावरण अत्यंत धोकादायक असून, यावर तातडीने कारवाई होण्याची गरज आहे.वाहतुकीच्या कोंडीबरोबरच, सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी आणि शाळेसमोर होणाऱ्या अशिष्ट वर्तनाला आळा बसावा, अशी अपेक्षा आहे.