मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने प्रचंड बहुमताने राज्याची सत्ता काबीज केली आहे. पण, आता मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवावे, अशी शिंदेंच्या आमदाराची मागणी आहे. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजप आमदार करत आहेत. अशातच, एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर, एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तसेच, अमित शाह उद्या फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकतात. त्यामुळे शिंदे उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. शिंदेंची नाराजी दूर करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. आता ते शिंदेंची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्वाचे आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अजित पवारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित पवारांनी दिल्लीतील भाजप हायकमांडला आपला निरोप कळवला आहे.

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर अजित पवार गटाला कोणतीही अडचण असणार नाही. अशा परिस्थितीत भाजप हायकमांड नेमका काय निर्णय घेणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेत आज दिवसभर चर्चा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंध महाराष्ट्र २४ तास फिरुन जनतेचं काम केलं आहे. त्याचा फायदा शिवसेनेला जितका झाला आहे तितकाच महायुतीला देखील झाला आहे. त्यापेक्षा जास्त फायदा भाजपला झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने आपली भावना मुख्यमंत्र्यांना कळवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. त्यानंतर ते उद्या दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आपल्याकडे दीड वर्ष मुख्यमंत्रीपद असावं, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या नेतृत्वात व्हाव्यात, अशी शिंदे यांची मागणी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता भाजप हायकमांड काय निर्णय घेतं? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे