पुणे : (प्रतिनिधी) – राज्यातील काही भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, विदर्भातही पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे.तसेच पुण्यातही पावसाच्या सरी बरसात आहेत. गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे

. विदर्भातील काही जिल्ह्यांत आज पावसाचा विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात सर्वदूर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा आणि यवतमाळ तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.