छत्रपती संभाजीनगर { प्रतिनिधी) ; सहकारी संस्थेच्या तालुका उपनिबंधकाविरोधात अनुसूचित जमातीतील महिला अधिकाऱ्याचा वारंवार अपमान करत, तिच्या जातीविषयी आक्षेपार्ह विधाने करत विनयभंग केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू रोडगे असे या आरोपीचे नाव असून, तो खुलताबाद येथे कार्यरत आहे.फिर्यादी महिला अधिकारी ही मागील काही वर्षांपासून सहकार विभागात कार्यरत असून अनुसूचित जमातीची आहे. आरोपी रोडगे याला हे माहिती असूनही तो वारंवार कार्यालयात तिचा जातीचा उल्लेख करून ‘तुमची अधिकारी होण्याची लायकी नाही’ असे अपमानास्पद शब्द वापरत असे. त्याच्या वागणुकीमुळे ती मानसिक त्रासाला सामोरी जात होती.

२४ एप्रिल रोजी रोडगे पुण्यात प्रशिक्षणासाठी असताना, त्याने व्हॉट्सअॅपवर संबंधित महिला अधिकाऱ्याला अश्लील मजकूर पाठवून त्रास दिला. महिलेला उद्देशून अश्लील चॅटिंग करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. क्रांती चौक पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) तसेच भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.