छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहरातील पहाडसिंगपुरा मौजे गट /सर्व न. ३९, ४०, ४०/१ ४०/२ ४०/३ मधील महार इनामी जमीन बोगस दस्तऐवजांच्या आधारे हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाऊनच्या काळात काही धनदांडग्या भूमाफियांनी बनावट बक्षीस पत्रे तयार करून, जुन्या कागदपत्रांत फेरफार करत, मूळ सातबारा उताऱ्यावर खोटी नावे चढवली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार मूळ वारसदारांची कोणतीही संमती न घेता आणि अधिकृत परवानगीशिवाय करण्यात आला आहे. या भागात कोणतेही बांधकाम किंवा प्रकल्प करता येऊ नये, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही भूमाफियांनी न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून लेव्हलिंगचे काम केले. एवढेच नव्हे, तर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर फार्म हाऊस उभारण्यात आले. प्रशासन आणि संबंधित विभागांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.मूळ दलित वारसदारांवर अन्याय होत असून, धनदांडगे लोक आणि प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने हक्काची जमीन बेकायदेशीररीत्या बळकावण्याचा हा प्रकार घडला आहे

. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या भूमाफियांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, दोषींवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जर तातडीने न्याय मिळाला नाही, तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.