छ. संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर येथील पहाडसिंगपुरा भागात महार इनामी जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करून ती जमीन भूमाफियांनी आपल्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभावशाली लोकांनी खासरा पत्रकात खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालय, महसूल विभाग तसेच पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत, गरीब कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार आर्थिक फसवणुकीपलीकडे जाऊन जातीय अन्यायाचे गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणावर दलित समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पेशवाई संपली तरी दलितांवरील अन्यायाची परंपरा थांबली नाही, असा सवाल संतप्त आवाजात उपस्थित केला जात आहे. भारतीय संविधानाने दलितांवरील अन्याय थांबवण्यासाठी कठोर कायदे केले असले तरी, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे भूमाफियांचे मनोबल वाढत आहे आणि अन्यायग्रस्त कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे

.दलित सामाजिक कार्यकर्त्यांनी दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून, भारतीय दंड संहिता कलम ४२० अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे. न्यायालय आणि महसूल विभागाची दिशाभूल करून केलेल्या या गंभीर गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अन्यायाविरुद्धच्या लढाईत अडथळे निर्माण होत असून, अन्याय सहन करणार नाही, असा निर्धार करत दलित समाजाने न्यायासाठी संघटित आवाज उठवला आहे. हा लढा फक्त एका जमिनीचा नाही, तर न्याय आणि हक्कांसाठी उभारलेल्या संघर्षाचा आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. भूमाफियांना अभय देणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली नाही तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.