छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : शहरातील मठ, धर्मशाळा आणि सामाजिक संस्थांमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या गरीब महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी साई आवास योजना कृती समितीने आजपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, मोठ्या संख्येने लाभार्थी महिला आणि कार्यकर्ते उपोषणस्थळी उपस्थित आहेत. या महिलांना अनेक वर्षांपासून समाजाच्या उपेक्षेचा सामना करावा लागत असून, त्यांना कायमस्वरूपी निवास मिळावा, यासाठी ही मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.

या विषयावर यापूर्वी दिनांक ५ एप्रिल व ८ एप्रिल २०२५ रोजी महापालिकेला निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय प्रशासनाकडून न घेण्यात आल्याने, आजपासून समितीने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक संस्थांच्या आश्रयस्थानी वास्तव्यास असलेल्या महिलांचा निवास हा तात्पुरता असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी “घरकुल” योजना उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे या महिलांना योजनेत सामावून घेऊन तातडीने घरे वितरित करावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर त्वरित निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि राज्यव्यापी स्वरूप धारण करेल.