छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, यासाठी 13 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कंपनीने 1 मार्च 2025 पासून नवीन वेतन प्रणाली लागू करण्यास सहमती दर्शविली आहे.
यासोबतच, कर्मचाऱ्यांसाठी काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने सकाळी ठरलेल्या वेळेत आपापल्या वॉर्डात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. त्यांना नेमून दिलेले मार्ग पूर्ण करावे लागतील आणि कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. कचरा संकलन पूर्ण झाल्याशिवाय वाहन पार्किंगच्या ठिकाणी आणता येणार नाही. याशिवाय, कर्मचारी विनाकारण अनुपस्थित राहू शकणार नाहीत. GPS प्रणालीशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, भंगार, पोळ्या, प्लास्टिक यांसारख्या वस्तू गोळा करून विक्री करताना आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरून कमी केले जाईल. ICCC कक्षाच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कंपनीवर दंड लागल्यास तो दंड संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात येईल. प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, कर्मचाऱ्यांनी या निर्णयानंतर संप करू नये. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि योग्य वेतन देण्यासाठी प्रशासन कितपत तत्पर आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.