जालना, १७ ऑगस्ट : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे “आओ गांव चले” या उपक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील महाकाळा गाव दत्तक घेऊन भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी IMA चे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर होते. सकाळी नाश्त्यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभानंतर तात्काळ रुग्ण तपासणीस सुरुवात झाली. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केल्यामुळे शिबिरात शिस्तबद्धता आणि उत्तम नियोजन जाणवले. या शिबिरात एकूण १०५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. नेत्र विभागात ऑटोरेफ्रॅक्टोमीटरद्वारे तपासणी करून शंभराहून अधिक रुग्णांना प्रथमच नंबर असल्याचे निदान झाले व गरजू रुग्णांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. शनिवारी घेतलेल्या रक्त नमुन्यांचे अहवाल देण्यात आले व कमी हिमोग्लोबिन आढळलेल्या रुग्णांना एमडी मेडिसिन तज्ञांच्या सल्ल्यानुसार एका महिन्याचे आयर्न टॅब्लेट्स मोफत देण्यात आले. ज्यांचे ब्लड शुगर वाढलेले होते, त्यांना एंडोक्रायनोलॉजी तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन व औषधोपचार मिळाले. त्वचारोग विभागात सर्वाधिक १७६ रुग्णांची तपासणी झाली ज्यामध्ये प्रामुख्याने स्टेरॉइड अॅब्यूजमुळे झालेले बुरशीजन्य संसर्ग व एक्झिमाचा समावेश होता.

शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मेंदूरोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, दंतरोग, रेडिओलॉजी आदी १५ पेक्षा जास्त विभागांतील तज्ञ डॉक्टरांनी सेवा बजावली. या वेळी बोलताना मा. राजेश टोपे म्हणाले की, “IMA ही केवळ डॉक्टर्सची संघटना नाही, तर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणारे सामर्थ्य आहे. असे भव्य आणि शिस्तबद्ध शिबिर डॉक्टरांच्या एकतेचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहे.” कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “ही मोहीम केवळ आरोग्य तपासणीपुरती मर्यादित नसून डॉक्टर समाजासाठी किती संवेदनशील आहेत याचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी आहे. प्रत्येक डॉक्टरने या ध्येयात सहभागी होणे हेच खरी राष्ट्रसेवा आहे.” IMA छत्रपती संभाजीनगर शाखेच्या सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि एकजुटीमुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या प्रयत्नामुळे “आओ गांव चले” उपक्रम खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक व पवित्र मिशन ठरले आहे.
